sitename_image

मानस-मंथन

मंथन श्रुतिका १५ ऑगस्ट २६

मीरा- अगं बाई! श्रावणी! ये नं.

श्रावणी- बाकी मीरा, तुमचा यंदाचा स्वातंत्र्यदिन जोरात दिसतोय! तुमच्या गॅलरीत तिरंगा अगदी डौलात फडकतोय. हर घर तिरंगा, होय नं?

मीरा- मग! स्वातंत्र्यदिनाच्या पर्वणीला येणाऱ्या पाहुण्यांचं स्वागत योग्य पद्धतीनंच करायला हवं नं! अहो, ही माझी मैत्रीण श्रावणी.

श्रावणी- नमस्कार मोहन भावजी.

मोहन- नमस्कार. ओळखलं की मी तुम्हाला. मागे तुम्ही आला होतात.

श्रावणी- माफ करा, जरा सकाळी सकाळीच आले आहे. ही खरं तर सगळ्यांचीच गडबडीची वेळ असते. पण काय करणार, दुपारी माझी बहीण यायची आहे मला भेटायला.

मीरा- आणि उद्या तर मी परत जाणारच आहे, होय नं?

श्रावणी- हो नं. काय करणार, दोन दिवसांची सुट्टी आली नं, त्याला जोडून काल रजा घेतली आणि म्हटलं, सोलापूरला जाऊन यावं.

मोहन- स्वातंत्र्यदिनी तरी स्वातंत्र्य उपभोगायचं असं ठरवलंय दिसतंय तुम्ही.

श्रावणी- हो, सुट्टी आहे ना. मग म्हटलं, आपण सोलापूरला गेलो की मुलांनाही स्वातंत्र्याचा अनुभव मिळेल.

मीरा- मुलांना तर मिळेलच, पण तुमच्या ह्यांना?

श्रावणी – हो, त्यांनाही मिळेलच नं. शेवटी स्वातंत्र्य काही फक्त राजकीय नसतं. विचार स्वातंत्र्य, उच्चार स्वातंत्र्य तसं व्यक्तिस्वातंत्र्यही हवंच की.

मोहन- हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर ज्याला त्याला ज्याची त्याची स्पेस हवी असते.

मंथन-२

श्रावणी- म्हणून तर ठरवलं, लाल किल्ल्यावरून होणारं पंतप्रधानांचं भाषण यावेळी सोलापूरला जाऊनच ऐकायचं. एवढ्यात मी सोलापूरला कोणाला भेटलेही नव्ह्ते. १५ ऑगस्ट १९४७ च्या देशाच्या स्वातंत्र्यापूर्वी काही तास का होईना स्वातंत्र्य उपभोगणारं सोलापूर हे माझं गाव याचा अभिमानच आहे की मला.

मीरा- लेकीला का नाही घेऊन आलीस? खूप वर्षांत तिला पाहिलं नाहीये मी.

श्रावणी- तिला म्हटलं होतं मी, चल म्हणून. पण तिला शाळेत स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पूर्ण वंदे मातरम् म्हणायचं आहे.

मीरा- वंदे मातरम् गाता गाता कितीतरी देशभक्त हुतात्मे झाले. कितीतरी आंदोलकांना

या गीतानं प्रेरणा दिली. त्यांच्या बलिदानातूनच तर स्वातंत्र्य मिळालं.

मोहन- आता संपूर्ण वंदे मातरम् म्हणायचं असा ठरावच पास झाला आहे की.

मीरा- हो, यंदा बंकीमचंद्रांनी लिहिलेल्या या गीताला दीडशे वर्षं झाली नं, त्यामुळे या गानाचं महत्त्व अधिकच आहे. आणि चिरंजीव? त्यांचं काय चाललं आहे.

श्रावणी- अभ्यास, वाचन, भाषणं. ऐकणं आणि करणंही.

मोहन- मग त्यानं पंतप्रधानांचं भाषण ऐकलं की नाही दिल्ली आयआयटीच्या दीक्षांत सोहळ्यातलं?

मीरा- हो नं, भाषण करणाऱ्यांनी भाषणं ऐकलीही पाहिजेत. प्रश्न विचारताय, चांगलीच गोष्ट आहे, पण तिथे थांबू नका. त्यांची उत्तरंही शोधा असं जे त्यांनी म्हटलं, ते त्यानं ऐकलं की नाही?

श्रावणी – एकलं नं.

मोहन- शेवटी ही मुलंच उद्याचे भारताचे नागरिक आहेत आणि त्यांनाच देशाचं भवितव्य घडवायचं आहे. आजचं पंतप्रधानांचं भाषणही तो ऐकणार आहे नं?

मंथन-३

श्रावणी – हो तर. उलट '''त्यानं''' मला आठवण करून दिली, स्वातंत्र्यदिनाचं भाषण ऐक. परत गेल्यावर आमच्याशी तो त्याबद्दल चर्चाही करेल. पण तो काय म्हणाला माहीत आहे? म्हणाला, जाशील सोलापूरला आणि तिथे गेल्यावर हरवून जाशील.

मीरा- हो, श्रावण आलाआणि श्रावणीही आली, म्हणून तुझी आई लेकीच्या कौतुकात , हो नं? ते चांगलंच आहे, पण बाईसाहेब, असं धावतपळत यायच्या ऐवजी जरा सावकाशीनं आला असतात तर—

श्रावणी- तर मीरा, मलाही ते खूपच आवडलं असतं. पण मी म्हटलं, धावतपळत का होईना, भेटी तरी होतील! मागच्या वेळेला तुझ्याकडे यायला वेळच मिळाला नाही, त्यामुळे –

मीरा- बाईसाहेब सकाळी सकाळी आल्या- चालेल.

मोहन- मीरा, मला वाटतच होतं, आज कोणीतरी पाहुणा येणार.

श्रावणी- त्याऐवजी पाहुणी आली. हो ना?

मीरा- श्रावणी, तू सकाळी सकाळी आलीस याचं काही वाटून घेऊ नकोस बरं का. तशीही आज सुट्टी आहे.

मोहन- आज शनिवार. यावेळी मित्र येण्याची या घराला सवय आहे. दर शनिवारी माझा मित्र राम आमच्याकडे येत असतो-

मीरा- रामभावजी आज गावाला गेले अचानक, त्यामुळे आम्हाला चुकल्याचुकल्यासारखं वाटत होतं.

श्रावणी- त्यांची जागा मी भरून काढली म्हणा की.

मोहन- या घराला पाहुणे हवेच असतात, तेव्हा तुम्हाला त्याबद्दल संकोच वाटण्याचं कारण नाही.

मंथन-४

श्रावणी- मोहनभावजी, आणि मीरा, तुमची जी काही कामं चालली असतील ती चालू द्या बरं का. म्हणजे माझ्या येण्यानं त्यात व्यत्यय नको. एकीकडे बोलता येईल.

मोहन- कामं काय होतच राहितील हो. माझी पूजा होतच आली आहे, एवढं इथलं आवरतो-

श्रावणी- मोहन भावजी, देवघराला काय छान आरास झाली आहे या फुलांनी!

मीरा- अगं गेल्या आठवड्यात बरा पाऊस पडला नं इथे. त्यामुळे पारिजातक तर नुसता बहरला आहे. फुलांचा नुसता गालिचा असतो सकाळी सकाळी.

मोहन- श्रावण आणि पांढरी फुलं यांचं घनिष्ट नातंच आहे.

श्रावणी- हो नं. सोमवारी १०८ बेलपत्रं आणि पांढरी फुलं वाहतात.

मीरा- सोमवारी शिवपूजा, मंगळवारी मंगळागौर, शुक्रवारी महालक्ष्मी – जिवतीची पूजा. पूजा म्हणजे काकडा, शेवंती, पिवळा झेंडू, जांभळा ऑस्टर यांनी देवीच्या किरिटापासून पैंजणांपर्यंत फुलांची सजावट करतात. सध्या तर जास्वंदीला बहरच आहे.

मोहन- पण मीरा, यंदा एकूणच पाऊस कमी झाल्यानं फूल बाजारात फारशी फुलं दिसत नाहीयेत बरं का.

श्रावणी – या आठवड्यात तर पावसानं दडीच मारली आहे.

मीरा- चीनमध्ये आलेल्या डॉल्फिन चक्रीवादळानं महाराष्ट्रातल्या पावसाची वाट रोखली आहे म्हणे.

मोहन- देशाच्या सीमा तुम्हा आम्हाला. या पंचमहाभूतांना काय, सबभूमी गोपालकी म्हणतात, तसं .

श्रावणी- मला सिद्धेश्र्वर मंदिराकडे जायचं होतं खरं दर्शनाला. तिथेही श्रावणामुळे जोरात तयारी चालू असेल नं?

मंथन-५

मीरा- हो तर. मंदिरात महिनाभर अभिषेक, सिद्धरामेश्र्वर पुराणाचं पारायण, महापूजेचं नियोजन झालंय. तुझी गाडी कधी आहे उद्या? पहाटेपासूनच भाविकांसाठी मंदिर खुलं असणार आहे. वेळ असला तर सकाळी तुला जाऊन येता येईल .

मोहन- पण तुमची गाडी तरी आहे कधीची?

श्रावणी – सकाळी सहा वाजता.

मीरा- मग सिद्धेश्र्वराला दर्शनाला जाणं तर शक्यच नाही.

श्रावणी- बघू पुढच्या वेळी.

मोहन- पुढच्या वेळी मात्र वेळ घेऊन या म्हणजे तुम्हाला पूर्व भागातल्या रथोत्सवाचाही अनुभव घेता येईल.

मीरा- यंदा पूर्व भागात सणाचा अधिकच उत्साह असेल कारण विडी कामगारांच्या किमान वेतनात वाढ जाहीर झाली आहे. विडी कामगार हा या भागाचा कणा आहे. मागच्या पेक्षा दर हजारी १३४ रुपयांची वाढ जाहीर झाली आहे. श्रावणाच्या तोंडावर ही चांगली बातमी आली म्हणून तिथे आनंदी आनंद असेल.

श्रावणी- मीरा, अगं पूर्व भागावरून आठवण झाली, तिकडे तर तेलुगू लोक जास्त. त्यांच्यात धार्मिकपणा जास्त आहे.

मोहन- त्यामुळे तर अक्कलकोट रोड हल्लीच्या भाषेत सांगायचं तर आध्यात्मिक कॉरिडॉर बनतोय. तिथल्या मठ आणि मंदिरातून सध्या कीर्तनं. प्रवचनं यांची धूम चालू आहे.

मीरा- सोलापूर हे जसं मिरवणुकींचं गाव तसं उत्सवाचंही माहेरघर. तुला माहीत आहे श्रावणी, परवा सिव्हिल हॉस्पिटलजवळच्या देवीचा उत्सव झाला. ती गवळी समाजाची देवी. तिची विधिवत पूजा तर झालीच, दुपारी म्हशी पळवण्याचा मोठा कार्यक्रमही झाला.

मंथन-६

श्रावणी- आमच्या घरी हा विषय निघाला नं, तेव्हा सगळ्यांना फार आश्चर्यच वाटलं होतं.

मोहन- म्हशी पळवण्याचा कार्यक्रम तर आपल्याकडे दिवाळीतल्या भाऊबीजेच्या दिवशीही होतो.

श्रावणी- हो, पण सोलापूरबाहेरच्यांना ही गोष्ट नवीनच होती नं. आमच्या दिवाळसणाला माझ्या सासरची मंडळी इथे आली नं, तेव्हा ते उत्साहानं या कार्यक्रमाला गेले होते.

मीरा- एकेका गावाचं वैशिष्ट्यच म्हटलं पाहिजे हे.

मोहन- मीरा, अगं तुम्ही दोघी मैत्रिणी बऱ्यात दिवसांनी भेटला आहात हे खरं आहे, पण म्हणून नुसत्या कोरड्या गप्पाच मारणार का?

मीरा- नाही नाही. हे काय दिवे केले आहेत.

श्रावणी- दिवे?

मीरा- त्याचं काय झालं, परवा दिव्याच्या अमावस्येला मी कणकीचे दिवे केले होते नं, ते रोहितला फार आवडले. म्हणाला, पुन्हा कर. म्हणून मगाशीच मी दिवे करायची सगळी तयारी करून ठेवली आहे. दिवे वळून उकडायलाही ठेवले आहेत. झालेच असतील. पाच मिनिटात त्यांची वाफ निघाली, की देते की श्रावणीला.

मोहन- तोपर्यंत चहा चालेल, हो की नाही श्रावणी?

मीरा- मला चहा हवा आहे हे सांगा नं, श्रावणीला कशाला घालताय मधे?

मोहन- त्याचं कसं आहे मीरा, चहा म्हणजे छोटासा ब्रेक असं जे दुरचित्रवाणी मालिकेत म्हणतात, तसं असतं. दुपारच्या सुट्टीतला ऑफिसमधला चहाही

मीरा—दुपारचा चहाही छोटासा ब्रेक. तसा हा चहा. सकाळचा छोटासा ब्रेक.

श्रावणी- आमच्या ऑफिसात चहा घेऊन येणारा मुलगा- पूर्वी खिशात नाणी खुळखुळवत यायचा. पण कसा बदल झाला आहे, चक्क म्हणतो, मॅडम, फोनवरून पैसे द्या.

मंथन-७

मोहन- यूपीआय पेमेंट .

मीरा – असं पैसे देणं सोपं आहे म्हणतात, शिवाय हा भारतीय प्लॅटफॉर्म आहे असंही मी ऐकलं आहे. पण आता त्यासाठी जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहेत म्हणे. खरं आहे का ते?

श्रावणी- असं अजिबात नाहीये. म्हणजे तुम्हा आम्हाला त्याचा भुर्दंड द्यावा लागणार नाहीये. कदाचित- अगदी कदाचितच हं, मोठ्या व्यवहाराच्या बाबतीत तसं घडेल. पण असं फोनवरून पैसे दिल्यानं नोटा छापणं, त्या बाळगणं, त्या खराब झाल्या तर बदलणं हा सगळा खटाटोप आणि त्यामुळे होणारा खर्चही वाचतो बरं का.

मीरा- बरं झालं बाई, तू खुलासा केलास .

मोहन- स्वतंत्र भारताच्या प्रगतीचे हेही प्रतीकच आहे म्हटलं. चला, मीरा, तुझे दिवे कुठपर्यंत आले?

मीरा- झालेच. श्रावणी, कसे झालेत ते बघ आणि सांग –

श्रावणी- स्वातंत्र्यदिनाची सुरुवात तर दिवे खाऊन झाली- वा! मस्तच !!

-----------------------------------------------------------

#ताजे लेखन #श्रुतिका