sitename_image

मानस-मंथन

मंथन श्रुतिका २२ ऑगस्ट २६

मीरा- या मीताताई!
मोहन- अलभ्य लाभ अलभ्य लाभ!
मीता- काय रे, काय झालं तुला आज! मी आल्यावर माझं असं स्वागत!!
मीरा- त्याचं काय आहे मीताताई, तुम्ही आज बऱ्याच दिवसांनी आलात नं? पंधरा ऑगस्टला येणार होतात –आम्ही तुमची त्या दिवशी वाटही पाहिली.
मीता- मी पंधरा ऑगस्टला येईन म्हटलं होतं, पण अचानक काकांच्या पंचाहत्तरीला जावं लागलं ना कोल्हापूरला- सोलापूरला किती दिवसांपासून यायचं होतं, पण काही ना काही कारणानं ते लांबतच गेलं त्यामुळे आज तुम्हाला न कळवताच आले.
मोहन- काही हरकत नाही मीताताई.
मीता- तुम्ही काही वाटून घेणार नाही हे माहिती आहे बाबा मला. म्हणून तर कोणतीही औपचारिकता न ठेवता धाडकन आले.
मीरा- पंधरा ऑगस्ट आहे, सुट्टी आहे, पण आज राम येणार नाहीये, मीता ताई येणार म्हणाल्या, पण आल्या नाहीत म्हणून हे सकाळपासूनच बेचैन होते.
मोहन- कोणाच्या येण्याची सवय झाली की असं होतं.
मीरा- पण मीताताई, तुमच्या दोघांच्या अनुपस्थितीची कसर माझ्या मैत्रिणीनं भरून काढली.
मीता- ते बरं झालं. सकाळी सकाळी आपल्याकडे कोणीच आलं नाही असं वाटायला नको, हो की नाही?
मोहन- हो ना.
मीरा- मीता ताई, आधी बसा. हे पाणी घ्या.
मंथन-२
मोहन- काका कसे आहेत? तिथला पंचाहत्तरीचा कार्यक्रम कसा झाला? तिथला स्वातंत्र्यदिन कसा वाटला?
मीता- काकांची तब्बेत एकदम ठीक. त्या निमित्तानं बरेच नातेवाईकही भेटले. तिथेही तसाच उत्साह होता. उजनी धरण, सोलापूरची महानगरपालिकेची इमारत वगैरे तिरंगी रोषणाईनं नटलेली फोटोत पाहिली. तिथल्या झेंडावंदनालाही काकांबरोबर आम्ही उपस्थित राहिलो. कार्यक्रमात ८० वर्षांनंतर प्रथमच संपूर्ण वंदेमातरम् चे सूर सगळीकडे निनादलेले पाहून आमच्या काकांचे डोळे पाणावले.
मोहन- ही ऐतिहासिक घटनाच होती म्हणा. यंदा वंदेमातरम् गानाला दीडशे वर्षं झाली त्या निमित्तानं हा बदल घडवला गेला ना!
मीता- त्याशिवायही एक कारण होतं काकांच्या गहिवरण्याला. त्यांनी १२० वर्षांपूर्वीची कहाणी सांगितली. १२0 वर्षांपूर्वी म्हणजे १९०६ मध्ये कोलकत्यात कॉ्ग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन झालं होतं. त्या व्यासपीठावर श्रीनिवास नारायण काडगावकर या सोलापूरच्या तरुणानं संपूर्ण वंदे मातरम् म्हटलं होतं. त्यांचा पहाडी आवाज लोकमान्य टिळकांनी हेरला आणि त्यांना अधिवेशनात हे गीत गाण्यासाठी नेलं. काडगावकरांनी त्याशिवायही देशभक्तिपर गीतं गायली, ती सोलापुरात घराघरात पोहोचवली. त्यामुळे या काडगावकरांना तर लोक पुढे ‘वंदे मातरम् काडगावकर’ म्हणूनच ओळखायला लागले. आमच्या काकांनी काही त्यांना पाहिलेलं नाही, पण त्यांच्या कुटुंबाशी काकांचा जुना परिचय होता.
मीरा- बरं का मीताताई, कोलकत्त्यात या आधी १८९६ मध्येही कॉंग्रेसचं अधिवेशन झालं होतं नं, तेव्हा असंच संपूर्ण वंदे मातरम् रवींद्रनाथ टागोरांनीही गायलं होतं.
मोहन- काय काय आठवणी असतात नं!
मंथन-३
मीता- हो नं. इथे असताना दर सोमवारी सिद्धेश्वराच्या दर्शनाला जायचं हे आमचं अगदी ठरलेलंच. सोमवारी मी कोल्हापुरातच होते. इथे आल्यावर सिद्धेश्वराला जायचं हे ठरवलेलंच होतं. ठरवल्याप्रमाणे पहिल्या श्रावणी सोमवारी सिद्धेश्वराला जाता आलं नाही म्हणून चुटपुट लागली होती.
मोहन- या वेळी आम्हालाही जमलं नाही सिद्धेश्वराच्या दर्शनाला जायला. येत्या सोमवारी –
मीरा- अहो म्हणजे परवाच की.—
मोहन- हो, परवा तुम्ही जाणार असाल तर आम्हीही येऊ.
मीता- सिद्धेश्वराचं देऊळ तसंही प्रसन्नच आहे. भोवताली पाणी, शहराच्या मध्यभागी असूनही शांत-
मीरा- त्यातही मीताताई, तिथल्या सभामंडपाला जे नवं रूप येतंय नं, ते साकारताना पाहायलाही मला फार आवडतं. दगडातून साकारणाऱ्या प्रतिमा- ते अगदी निसर्गाचं शांत रूप वाटतं. आता त्या दगडी प्रतिमा नवीन साधनांनी घडवल्या जाताहेत म्हणे.
मोहन- ते सगळं काम झालं नं, की मग तो सभामंडप खरा वैभवशाली वाटेल.
मीता- आणि सिद्धेश्वरांची समाधीही फुलांनी पूर्वीसारखीच सजवली जाते का?
मीरा- हो मीताताई.
मोहन- पण तसं कशाला? सोमवारी तुम्हीच पाहा नं.
मीता- यंदा फुलं कमीच आहेत असं ऐकतेय मी.
मीरा- हो, पण अशावेळी त्यांची कमतरता जाणवू देत नाही कोणी. पण त्या समाधीपुढे फोटो काढणाऱ्यांची किती ती गर्दी!
मीता- मी सिद्धेश्वरांच्या समाधीचा एक फोटो काढला होता फार पूर्वी. तो आता देवघरात ठेवला आहे मी. पूर्वी फोटो काढणं फार सोपं नव्हतं.
मंथन-४
मोहन- आता फोटो काढणं फार सोपं झालं आहे, त्यामुळे कशाचेही फोटो काढले जातात खटाखट खटाखट.
मीता- फोटो काढायचे आणि समाजमाध्यमांवर पोस्ट करायचे. काय खाल्लं, काय बघितलं, कुठे गेलो, कोण भेटलं, सर्व काही सार्वजनिक.
मीरा- या सतत ऑनलाईन राहण्याचे बरेच धोके आहेत. शारीरिक, मानसिक, सामाजिक. पण काय करणार!
मोहन- या नव्या पिढीला ऑनलाईन शिक्षण घ्यावं लागतं, नोकरी, व्यवसायासाठीही ते आवश्यक होतं.
मीता- पण ते तिथेच थांबत नाही, करमणुकीसाठीही ही पिढी ऑनलाईनच जाते. काळाचा महिमा म्हणायचा !
मीरा- काळाचा महिमा तर आहेच, पण त्यामुळे या सवयीचं व्यसनात रूपांतर होतंय त्याचं काय?
मोहन- त्यामुळेच अमेरिकेतल्या न्यू मेक्सिको राज्याच्या न्यायालयानंच फेसबुक आणि इन्स्टाग्राम चालवणाऱ्या मेटा या कंपनीवर दंडा उगारला . मुलं आणि तरुणांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो त्याबद्दल या कंपनीला तब्बल ९हजार ३० कोटी रुपयांचा दंडही आकारला आहे.
मीता- बापरे!
मीरा- मीताताई, या पैशातून युवकांवर उपचार केले जाणार आहेत. शिवाय कंपनीवर काही निर्बंधही घालण्यात आले आहेत. आरोग्याशिवाय फसवाफसवी करणे, लैंगिक शोषण करणे वगैरेहींनाही कंपनीद्वारे खतपाणी घातलं जातंय असे आरोप होते. या आरोपांसंबंधातील काही कुटुंबंही या सुनावणीच्या वेळी उपस्थित होती, त्यांची माफीही कंपनीचे मालक मार्क झुकेरबर्ग यांना मागावी लागली.
मंथन-५
मोहन- त्याबरोबरच मी वाचलं, ते या निर्णयाविरोधात अपील करणार आहेत.
मीता- तो त्यांचा न्यायालयीन मार्ग झाला, पण या व्यसनातून जे धोके उत्पन्न होताहेत- आपल्याकडेही- त्यांच्यावर आपण समाज म्हणून, पालक म्हणून विचार करणार आहोत की नाही?
मोहन- आताच आपण म्हटलं नं, हे व्यसन आहे.
मीरा- हो, पण अगदी व्यसनातून बाहेर पडणं अवघड असलं तरी अशक्य मात्र नाही. फक्त त्यासाठी निश्र्चय मात्र हवा.
मीता- हे मात्र अगदी खरं आहे. निश्र्चय मात्र हवा. पण एकदा माणसाला तो काय चुकीचं करतो आहे याची जाणीव झाली नं, की तेही शक्य होतं.
मोहन- ही नवी पिढी इतकी हुशार आहे, की तिला आपल्या चुकीची जाणीव नक्की होईल .
मीता- स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी नक्षलवाद संपवल्याची माहिती दिली की नाही, त्या नक्षलवादी तरुण तरुणींना जेव्हा त्यांची चूक समजली, तेव्हा ते शरण आले आणि त्यांनी नवा मार्ग निवडला.
मीरा- नवा मार्ग, नवं आयुष्य! बंदुका आणि तलवारी सोडून जंगलातलं वणवण फिरणं सोडून ही मंडळी जबाबदार नागरिक म्हणून जगू लागली आहेत. काही व्यवसाय करू लागली आहेत.
मीता- हो, मी तर एक फोटो परवा पाहिला, त्यात पूर्वी नक्षलवादाची कास धरणाऱ्या तरुणी फॅशन विश्वाचा भाग बनून चक्क रॅंप वॉक करत होत्या.
मीरा- मी सुद्धा पाहिलाय तो फोटो. मीताताई. तुम्ही दमून आला आहात, तेव्हा हा चहा.
मंथन-६ मोहन- इंग्रजीत म्हण आहे नं, चेंज इज द स्पाईस ऑफ लाईफ.-
मीता- थोडक्यात काय, बदलात खरोखर जग जगते.
मीरा- कसं बोललात! मीताताई, तुम्हाला माहीत आहे नं, सोलापूरातल्या कचराकुंड्या काढून टाकल्या, त्याऐवजी कचरा उचलणाऱ्या घंटागाड्या ते काम करू लागल्या आहेत.
मोहन- त्या गाड्यांना घंटागाड्या म्हणतात खरं, पण या गाड्या तर स्वच्छतेची गाणी गात आपण आल्याची वर्दी देतात. पण त्यांचं काय मीरा?
मीरा- सांगते नं. सोलापूर मोठं झालंय असं आपण म्हणतो नं, मग ऐका. १८०हून अधिक मार्गांवरून सुमारे दोनशे अशा गाड्या रोज फिरतात. त्या किती कचरा गोळा करतात, माहिती आहे का? रोज दोनशे टनाहून जास्त कचरा गोळा होतो.
मीता- म्हणजे रोज कचऱ्याचा डोंगरच व्हायचा.
मोहन- हो, पण आता त्या कचऱ्याच्या डोंगरावर प्रक्रिया केली जाते आणि त्यापासून चक्क वीज तयार केली जाते.
मीरा- थोडी थोडकी नाही, दोन तीन मेगावॉट.
मीता- म्हणजे प्रदूषण नाही आणि तयार होते हरित ऊर्जा. मग मला वाटतं मीरा, जरा पंखा लाव असं म्हणायला हरकत नाही.
मोहन- लावतो की पंखा. मी खिडकीजवळ बसलो आहे त्यामुळे मला उकाडा तेवढा जाणवला नाही.
मीरा- आणि मी आत बाहेर करते आहे. त्यामुळे मलाही ते जाणवलं नाही.
मोहन- मीरा, उकाडा जाणवणारच आहे. पाऊस आहे कुठे?
मीता – एकीकडे तर म्हणताहेत, यंदा जवळपास सरासरी पाऊस पाऊस झालाय.
मंथन-७
मीरा- त्यानं सरासरी तर गाठली असेल कदाचित, पण काही ठिकाणी पूर आले आणि आपल्याकडे खडखडाट. आपल्याकडची खरिपाची पिकं कशी जगतील याची चिंता आहे शेतकऱ्यांना. एल नीनो आपला प्रभाव दाखवायला लागलाय.
मीता- अस्मानी संकट म्हणतात ते असं. पण वंदे मातरम् मध्ये म्हटल्याप्रमाणे आपल्याला सुजलाम सुफलाम व्हायचं असेल तर काही गोष्टी कराव्याच लागतील. एक म्हणजे काटकसरीनं पाण्याचा वापर.
मोहन- दुसरं म्हणजे कमी पावसात तगतील अशा पिकांची निवड
मीरा- आणि तिसरं तुम्ही आम्हीही करू शकतो असं- जलपुनर्भरण.
मीता- नदी जोड प्रकल्प होईल तेव्हा होईल, पण सगळ्या गोष्टी सरकारनं कराव्यात अशी कशी आपण अपेक्षा करू शकतो?
मोहन- लोकशाही स्वीकारताना इथल्या नागरिकांनी हक्काबरोबर कर्तव्यंही केली पाहिजेत हे आपण विसरत चाललो आहोत की काय असं विचारावंसं वाटतं.
मीरा- श्रमविभागणी आणि श्रमप्रतिष्ठा ही अजरामर मूल्यं आहेत.
मीता- स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं १७ खेळाडूंना अर्जुन पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांनी मिळवलेलं यश काय सहजासहजी मिळालं का? त्यांनी अपार श्रम केले तेव्हाच ते या सन्मानाला पात्र झाले की नाही?
मोहन- नक्कीच. तेव्हा स्वातंत्र्यदिनाच्या या महिन्यात आपण भारताचे सजग नागरिक म्हणून श्रमही करण्याची, प्रामाणिकपणे आपापलं काम करण्याची प्रतिज्ञा करू या.
-------------------------------------------------

#ताजे लेखन #श्रुतिका