sitename_image

मानस-मंथन

मंथन श्रुतिका १ ऑगस्ट २६

राम- या मीरा वहिनी! मी विचारच करत होतो, सकाळी सकाळी मीरा वहिनी गेल्या तरी कुठे?

मीरा-(येत) कुठे जाणार? खाली अंगणात गेले होते.

राम- आणि मोठी लूट आणलेली दिसत्ये.

मोहन- लूट?

राम- नाही तर काय, मीरा वहिनींच्या हातात काय आहे पाहिलं आहेस नं?

मोहन- हो, फुलं—

मीरा- या फुलांना लूट म्हणताय का तुम्ही राम भावजी?

राम- मग काय? लाल, गुलाबी, पांढऱ्या लहान मोठ्या फुलांचा खजिनाच दिसतोय तुमच्या हातातल्या तबकात—

मीरा- आहे खरा हा खजिना. पाहिजातकाची फुलं किती नाजुक अन् लहान, पण पावसानं किती टपोरी झाली आहेत—नुसता सडा पडलाय.

मोहन- किती हौशीनं मीरानं जुईचा वेल लावला होता, त्या वेलाला तर जुनमध्ये कळ्याही लागल्या, पण –

मीरा- पण त्या न उमलता वेलावरच कोळपल्या. आणि आता- आता बघा- तीही फुलं कशी टपोरी झाली आहेत-

राम- जास्वंदीचं झाडही पावसाच्या आनंदानं चांगलंच डोलत होतं-

मोहन- यंदा पावसाळा किती उशीरा सुरू झाला!

मीरा- जून आणि बराचसा जुलैही कोरडाच गेला.

मंथन-२

राम- पण आषाढाच्या पहिल्या दिवशी नभ मेघांनी आक्रमिले-

मोहन- आपण किती उशीर केला याची लाज वाटली असावी वरुणराजाला.

मीरा- हो, पण ती थकबाकी भरून काढताना पुण्या मुंबईला तर कहरच केला त्यानं.

राम- पण पुणे जिल्ह्यातल्या पावसानं उजनी धरण भरलं, हेही नसे थोडके.

मोहन- निदान आपल्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली.

मीरा- पण शेतीचं काय? मोसमी पाऊस लहरी असतो हे आपण शाळेपासून घोकत आलो, पण यंदा तर त्यानं फारच ताणलं बाई.

राम- वारीवर पावसानं बरसात केली. तिकडे भक्तीचा पूर आला आणि इकडे चंद्रभागेला.

मोहन- पंढरपूरला पुराचा इशारा दिला आहे . दगडी पुलावरून पाणी वाहू लागलं आहे. पण आपले वारकरी कशालाच घाबरत नाहीत बाकी. यंदा तीस लाखाहून अधिक वारकरी आले म्हणे पंढरपूरला.

राम- एआयचा अंदाज आहे ३२ लाखांचा. त्यामुळे मुखदर्शनाची रांग तीन किलोमीटर पर्यंत गेली होती.

मीरा- असेल बाई. एसटीच्या सोलापूर विभागानं वारकऱ्यांसाठी तब्बल २३५ जादा बसगाड्या सोडल्या, तर रेल्वेनं ९० विशेष रेल्वे गाड्या सोडल्या.

मोहन- त्यामुळे यंदाची चातुर्मासाची सुरुवात तर जोरात झाली असं म्हणायला हरकत नाही. पंढरपूरच्या विठ्ठलाची रथयात्रा, बार्शीच्या भगवंताची रथयात्रा यांनी सगळा परिसर दुमदुमूनच गेला.

मंथन-३

राम- हो, कारण एकादशीपाठोपाठ गुरुपौर्णिमा आली नं. या सप्ताहात पारायण, उपासना, नामस्मरण चालू होतं. अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला गर्दी जशी झाली, तशी ठिकठिकाणच्या मंदिरातही भक्त दर्शनाला जात होते. या सगळ्या भक्तिसोहळ्याला सामाजिक संस्थांनी फराळ वाटप ,फळं वाटप करून हातभार लावला.

मोहन- फक्त पोटोबाचाच विचार झाला असं नाही, तर नदीत स्नानाला गेलेल्या ३५ भाविकांनाही वाचवलं गेलं. हेही मोठंच पुण्याचं काम नाही का?

मीरा- अखिल विश्व गायत्री परिवारानं ११ हजार १शे११ तुळशीच्या रोपांचं वाटप केलं.

राम- आपले सण आणि उत्सव हे फक्त भक्तीचाच विचार करत नाहीत. ते एकंदर निसर्गाचा समतोल कसा राखला जाईल याचा विचार करतात. म्हणून बहुतेक देवांना फुलं वाहतात. प्रत्येक देवाचं आवडतं फूल किंवा फळ म्हणून त्या त्या झाडांचं संवर्धनही केलं जातं.

मोहन- आणि आपल्या प्राचीन मंदिरांनी तर भक्तीबरोबरच शिल्पकला, वास्तुकला, नृत्यकला, नाटक अशा विविध कलाप्रकारांचं सम्मेलनच घडवलं आहे म्हणा ना. कीर्तनातून समाजजागृती होतच आली आहे.

मीरा- समाजजागृतीचा एक वेगळा पैलू नुकताच अक्कलकोटकरांनी दाखवला बरं का. भक्तिरन म्हणून हजाराहून अधिक धावपटू तिथे धावले.

राम- पावसाचे दिवस म्हणजे वृक्षलागवडीचे दिवस, झाडांचं महत्त्व किती आहे ते वेगळं सांगायला नको. विशेषतः सोलापूरसारख्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात तर त्यांचं महत्त्व जास्तच आहे.

मोहन- म्हणून तर धर्माधिकारी प्रतिष्ठाननं रविवारी तब्बल दोन हजार रोपं लावली. त्यासाठी १६शेहून जास्त सभासदांनी या मोहिमेत सहभाग नोंदवला.

मंथन-४

मीरा- आपणही आपआपल्या पातळीवर जमतील ती झाडं लावली पाहिजेत.आमचं महिला मंडळ त्यात अग्रेसर आहे बरं का. वड, पिंपळ, जांभूळ, चिंच वगैरे झाडं एकदा मोठी झाली की त्यांची तशी काळजी फारशी घ्यावी लागत नाही. फक्त ती तोडली जात नाहीत एवढी काळजी मात्र घ्यायला हवी. त्यातही देशी झाडं लावली जातील हे मात्र पाहिलं पाहिजे.

मोहन- ती रोपं असताना त्यांची काळजी घ्यावीच लागेल.

राम- मोहन, रोप अवस्थेतील झाडांची जशी काळजी घ्यावी लागते, तशीच आपल्या लहानग्यांचीही काळजी घ्यायला हवी.

मीरा- हो, अर्थातच. आपण आपल्या मुलांची काळजी घेतोच की.

राम- मीरा वहिनी, तुम्हाला माझ्या या म्हणण्याचं जरा आश्चर्य वाटलं असेल. पण काळजी घेणं म्हणजे काय, ते जरा समजून घ्यायला हवं. आपण मुलांना शिकवतो. त्यांचं भविष्य घडवण्यासाठी त्यांच्यावर चांगले संस्कार करतो,--त्यांना चांगलं घर मिळावं, चांगलं खायला प्यायला मिळावं म्हणून झटतो-

मोहन- हो, हे सर्व आपण करतोच, मग तुला काय म्हणायचं आहे?

राम-रागावू नको मित्रा, त्यांच्यासाठी हे सर्व करताना काही वेळा आपल्या आवडी निवडी मागे ठेवतो, आणि त्यांना हवं ते देतो. परवा- म्हणजे काही दिवसांपूर्वी काय झालं सांगतो. मी काहीतरी खरेदीला दुकानात गेलो होतो. सुट्ट्या संपत आल्या होत्या. मुलं दोनचार दिवसांपुरती सहलीला जाणार होती. त्यांना बरोबर देण्यासाठी एका जोडप्यानं चिप्सच्या पाकिटांची एक माळच घेतली. रोज खातील एक दोन पाकिटं म्हणून.

मीरा- हो, हे चित्र मीही पाहिलं आहे.

मंथन-५

मोहन- हो, पण हे चिप्स काय, पिझ्झा , बर्गर काय किंवा तत्सम काही जिन्नस काय, चटकदार लागतात म्हणून मुलं त्यांच्यावर उड्या टाकतात हे खरं आहे, पण कधीतरी असं करणं वेगळं आणि नेहमी सोयिस्कर पडतं म्हणून मुलांना या गोष्टी देणं वेगळं. मोहन-अशा फास्टफुडनं मन भरतं, पण शरीराचं मात्र नुकसान होतं. लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो आहे याचं हेही हे कारण आहे.

मीरा- हो, मैदानी खेळांऐवजी बैठै किंवा मोबाईलवरचे खेळ, फास्ट फुड, कमी हालचाल, वगैरे अनेक कारणांनी मुलांची वाढीच्या वयात जशी वाढ व्हायला हवी तशी होत नाही, किंवा लहानपणीच अनेक रोग मागे लागतात. कारण पौष्टिक अन्नाची कमतरता.

राम- आणि काही वेळा ती पैशाअभावी असेलही, पण बऱ्याचवेळा असते अती लाडापायी. म्हणूनच आता शाळेपासून ५० मीटरपर्यंत फास्टफुड विक्री करायला बंदी घालण्यात आली आहे.

मोहन- हे चांगलंच आहे, पण डब्यात हे पदार्थ सोय म्हणून दिले जाऊ नयेत याची काळजी तुम्ही आम्ही म्हणजे पालकांनीच घ्यायला हवी.

राम- हे झालं मुलांबद्दल. पण मोहन, आपल्याला एखादा कप चहा घ्यायला काही मनाई नाही ना?

मोहन- अजिबात नाही-

मीरा- रामभावजी, तुम्ही येणार म्हणून मी चहाजी तयारी करूनच ठेवली होती. चहा तयार आहे. हा चहा.

राम- चहाचं नाव काढलं की चहा हजर. मीरा वहिनी, तुमच्याकडे तो बाटलीतला राक्षस नाही ना?

मीरा- बाटलीतला नाही, पण घड्याळातला आहे. तो सांगतो, किती वाजले, मग त्याप्रमाणे आपण काम करायचं.

मंथन-६

मोहन- त्यामुळे मला कधी जेवणाला उशीर झाला म्हणून ऑफिसला उशीर करता येत नाही-

राम- रोहितला शाळेत किंवा क्लासला उशीरा जाण्याची संधी मिळत नाही.

मीरा- म्हणजे मी वक्तशीर आहे हा माझा गुन्हा आहे, का ----

राम- नाही वहिनी, आम्ही तुमचं कौतुक करतोय. फक्त मला तुम्हा दोघांना एवढंच सांगायचं आहे, क्लासचा विषय निघाला म्हणून सांगतो, रोहितवर कोणताही दबाव आणू नका.

मोहन- नाही रे बाबा. आम्ही कशाला त्याच्यावर दबाव आणतोय?

मीरा- आपल्या लहानपणी क्लासला जाणं कमीपणाचं समजलं जायचं, पण आता तसं नाहीये. मी तर ऐकलंय, काही शाळा किंवा महाविद्यालयचं मुलांना क्लासला जायला प्रवृत्त करतात.

राम- कारण आजची जीवघेणी स्पर्धा. पण त्याच्यावर उत्तर आहे, अभ्यास. क्लासमधली घोकंपट्टी नाही, की क्लासमध्ये मिळणाऱ्या टिप्स नाहीत.

मोहन- यातूनच तर ते नीटच्या पेपरफुटीचं प्रकरण उद्भवलं.,

मीरा- त्यामागच्या गुन्हेगारांना तर पकडलंच आहे, त्यांच्यावर योग्य ती कारवाई होईलच, पण जोडीला सरकारनं परीक्षापद्धती सुधारण्यासाठी इन्फॉसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या नेतृत्त्वाखाली एक उच्चाधिकार कृतिदल किंवा टास्कफोर्स स्थापला आहे.

राम- त्यांच्या या कृतिदलात इस्रोचे माजी अध्यक्ष एस सोमनाथ, आयआयची मद्रासचे संचालक व्ही कामकोटी, गुप्तचर विभागाचे माजी संचालक तपन डेका आहेत.

मोहन- शिवाय माजी शिक्षण सचिव अनिता कारवाल, लॉजिस्टिक तज्ज्ञ अमृतलाल मीनाही आहेत .

मंथन-७

मीरा- एवढंच नाही, तर परीक्षांमध्ये काय बदल हवेत याबरोबरच गुन्हेगारांना जरब बसावी म्हणून कडक शिक्षेचीही तरतूद करण्यात आलेली आहे.

राम- तेव्हा रोहित जर अशा परीक्षांना बसला तर त्याला त्या बिनघोर देता याव्यात यासाठी हे सर्व चालू आहे. शेवटी पुढची पिढी जर चांगली घडवायची तर ती चांगली पोषणमूल्य असलेलं खातील पितील याबरोबरच त्यांच्या आकांक्षांना वाट मिळेल याचीही खात्री आपण करून घेतो आहोत हे त्यालाही समजावून सांगा.

मोहन- अर्थातच. हे सर्व आम्ही सांगतोच, त्यात जर आम्ही कमी पडतोय असं वाटलं तर तू आहेसच आमचे कान उपटायला.

राम- फक्त तुमचेच नाही, रोहितही जर सारखं फास्ट फूड खायला लागला, त्याचा स्क्रीन टाईम वाढायला लागला तर त्याचा हा काका त्याचेही कान चांगलेच उपटेल बरं का.

--------------------------------------------------------------------

#ताजे लेखन #श्रुतिका