sitename_image

मानस-मंथन

मंथन श्रुतिका १ नोव्हे २५

मोहन- (गुणगुणतो) खुष है जमाना आज पहली तारीख है---

"राम-(येत) वा! काय मोहनराव, जमाना तर खूष आहेच, पण आज तुम्हीही जास्त खुष दिसताय! काय विशेष?

"मोहन- अरे, आपण तर नेहमीच खूष असतो बाबा. नसायला काय झालं? छान सकाळ पडली आहे, पाऊस येणार होता असं ऐकलं होतं, पण सुदैवानं तो तसा आला नाही—

मीरा- खरं आहे बाई. ये रे ये रे पावसा असं आपण लहानपणी म्हणायचो, पण मे महिन्यापासून तो जो हात धुवून मागे लागला आहे,---येत्या पाच तारखेपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे म्हणे.

राम- हं. परतीचा पाऊसही झाला म्हणजे पावसाळा संपला म्हणून लोक सुटकेचा निश्वास टाकतात म्हणता म्हणता या मोंथा वादळामुळे पुन्हा पाऊस आहेच. तिकडे आंध्र, तमीळनाडू, ओरिसात वादळ, पावसानं नको नको केलंय.

मोहन- म्हणून तर सगळे जा रे जारे पावसा असं गाणं म्हणताहेत.

मीरा- पण कितीही जा म्हटलं तरी यंदा तरी तो हटायलाच तयार नाहीये.

मोहन- ते खरं आहे, पण या काळ्या ढगांना सोनेरी किनार आहे की नाही?

आज तरी पावसानं विश्रांती घेतली असावी. गेले दोन दिवस आकाश ढगाळलेलं होतं. परवा चाहूल न देताही तो चक्क सडा टाकून गेला.

मीरा- हो नं. मी आपलं बाहेर पाहाते आहे तो रस्ता ओला. पण आज त्याला माहीत होतं नं, रामभावजी यायचे आहेत. त्यामुळे त्यानं चक्क दडी मारली.

राम- चला, माझ्या येण्याचा तेवढा जरी परिणाम झाला तरी पुरे. मोहन, यंदा पावसानं अतोनात नुकसान केलं. शेतं धुवून नेली, विहिरी बुजवल्या, घरं, संसार

मंथन-२

उघड्यावर आणले, माणसं, जनावरं वाहून गेली. पण अशा आपत्काली लोकांमधली माणुसकी मात्र जागी झालेली पाहायला मिळाली.

मोहन- खरं आहे बाबा. अगदी जिवावर उदार होऊन लोकांनी अगदी अनोळखी लोकांनाही वाचवण्याचा प्रयत्न केला. पूरग्रस्तांना मदतीचा शक्य तेवढा हात दिला.

मीरा- आमच्या मंडळातल्या सगळ्या बायकांनी दिवाळी फराळही करून त्यांना पोहोचवला.

राम- मीरा वहिनी, ही झाली माणुसकी. पण निसर्गानंही काही प्रमाणात आपल्याला हात दिला आहे हेही विसरता कामा नये.

मोहन- कसा हात दिला सांग पाहू. अरे, आपण निसर्गावर जो अत्याचार करतो आहे, त्याचाच परिणाम म्हणून हवामान बदलतंय.

राम- बरोबर. आपण फटाके उडवतो. गाड्या मोठ्या प्रमाणात वापरतो. त्यानं इंधन जळून वायुप्रदूषण होतं. या वायुप्रदूषणामुळे आपल्या देशात २०२३ मध्ये म्हणजे दोन वर्षांपूर्वी २० लाख लोकांचा मृत्यू झाला असं संशोधन अहवाल म्हणतो. तो अहवाल असं सांगतो की महाराष्ट्राबरोबरच उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये प्रदूषणजन्य आजारांमुळे सर्वाधिक मृत्यू झाले .

मीरा- ही चिंतेचीच बाब आहे रामभावजी. पण गेल्या दोन तीन वर्षांत तुम्हाला जाणवलं आहे का, लोकांमध्ये याबद्दल जागृती वाढते आहे. दिवाळीत फटाके उडवण्याचं प्रमाण कमी होतंय. गणपती उत्सव आणि नवरात्रीतही सोलापूरकरांनी डीजे न वाजवता इतरांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

मोहन- यंदाही दिवाळीत ध्वनिप्रदूषणात दिवसा घट झाली पण रात्री वाढ झाली अशी नोंद आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सर्वाधिक प्रदूषण झालं. ध्वनिप्रदूषण आणि अर्थातच हवेचंही. पण त्याचं प्रमाण घटतंय ही सकारात्मक बाब नाही का?

मंथन-३

मीरा- अर्थातच आहे. आणि मी तर वाचलं, ज्या पावसाला आपण नको नको म्हणतोय, त्यानं हवेतलं प्रदूषण कमी केलं.

राम- याच पावसानं खूप शिव्या खाल्ल्या हे खरं आहे, पण दुष्काळी जिल्हा म्हणून प्रसिद्धी असलेल्या सोलापूर जिल्ह्यातली भूजल पातळी सव्वा दोन मीटरनं वाढवली आहे, आहात कुठे? माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर तालुक्यात ही पातळी सर्वाधिक वाढली आहे.

मीरा- म्हणजे यंदा पाणी टंचाईची बात नस्से.

मोहन- बरोबर. आणि आपल्याला माहीत नसलेली अदिला नदी पुरामुळे आपल्याला माहीत झाली.

राम- आणि त्यामुळे आता तिच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न सुरू झाले आहेत.

मीरा- हो नं. आम्ही तर म्हणायचो, सोलापूरच्या नावातच '''पूर '''आहे.

मोहन- ते आता खोटं ठरलं की नाही?

मीरा- अगदी बरोबर. आता असे पूर रोखण्यासाठी काय उपाययोजना करायची त्याचा गंभीरपणे विचार व्हायला हवा.

मोहन- त्याचबरोबर अशाही हवामानात टिकतील अशा पिकांच्या जाती विकसित करायला हव्यात. पुराचं पाणी जमीनीत कसं मुरेल याची शास्त्रशुद्ध माहिती लोकांना द्यायला हवी.

राम- उदाहरणार्थ, झाडं लावायला हवीत. त्यांचं संवर्धन करायला हवं.

मीरा- परसबाग सोलापूर या गटानं केलेल्या उपक्रमासारखे उपक्रम राबवायला हवेत. विजापूर रस्त्यावरच्या आदित्यनगरमध्ये वडाच्या झाडाचं पूजन करून भाऊबीजेला त्याला औक्षण करण्यात आलं. सर्व देशी झाडं वाचवू, लावू आणि त्यांचं संगोपन करू अशी प्रतिज्ञा लोकांनी केली.

मोहन- म्हणजे वटपौर्णिमेसारखं इतरही दिवशी वडाचं पूजन केलं जायला लागलंय म्हणा की.

मंथन-४

राम- ते तर जरूरच आहे. सगळेच वृक्ष खरे तर आपलं संरक्षण करतात. पाणी, माती धरून ठेवतात. आता ही पंढरपूरची वारीच घ्या. पूर्वी रात्री झाडांखालीच वारकऱ्यांना वारीच्या वेळी आसरा घ्यायला लागायचा की.

मीरा- आता तेवढी झाडंही राहिली नाहीत-

मोहन- किंवा आता काळानुसार वेगळ्या पद्धतीनं वारीचं नियोजन होतंय. पूर्वी चालण्याला पर्याय नव्हता. आता यावेळच्या कार्तिकी यात्रेसाठी एसटी महामंडळानं किती गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय माहीत आहे?

राम- शेकडो गाड्या लागत असतील.

मोहन- तब्बल साडे अकराशे गाड्या सोडण्याचं नियोजन केलंय त्यांनी. पंढरपूरमध्ये चंद्रभागा बसस्थानकावर एक हजार बस लावण्याची व्यवस्था केलेली आहे. उद्या पहाटे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे. आलेल्या भाविकांना २४ तास मुखदर्शन आणि पदस्पर्शदर्शन घेता येतंय. ९ नोव्हेंबरपर्यंत देवाचे सर्व राजोपचार बंद राहणार आहेत. व्हीआयपी दर्शन बंद केलं आहेच.

मीरा- इतके भाविक येणार म्हटल्यावर असं नियोजन हवंच.

राम- मीरा वहिनी, हे झालं एसटीचं. शिवाय मध्ये रेल्वेनंही यात्राकाळात विशेष रेल्वे गाड्या सोडल्या आहेत. सोलापूर, लातूर, मिरज मार्गावर ३६ विशेष फेऱ्या असतील.

मोहन- महाराष्ट्रच काय, बाहेरच्या राज्यांमधून येणारे भाविकही असतात नं.

राम- हे झालं पंढरपूरच्या यात्रेचं नियोजन. काय मग मोहनराव, उद्या तुमच्या उपासाचं नियोजन काय?

मीरा- काही फळं आणून ठेवली आहेत नं.

राम- हं, ही सफरचंदं दिसताहेत. इंग्रजीत म्हण आहे नं, An apple a day, keeps a doctor away. रोज सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा.

मंथन-५

मोहन- या म्हणीतलं सफरचंद हे फळांचं प्रतीक आहे. सर्वच फळं पौष्टिक असतात. त्यामुळे आमच्या फळांच्या यादीत सफरचंदांशिवाय सीताफळ, पेरू आहेतच. सध्या सीताफळं किती जिकडे तिकडे दिसताहेत—

राम- शिवाय केळी असतीलच. पण नेहमीचे साबूदाणा बटाटा वडे आहेत की नाही? साबूदाणा वडा म्हणजे मीरावहिनींचा हातखंडा प्रयोग. काय मग वहिनी, साबूदाणा भिजवलात ना?

मीरा- काय रामभावजी, हातखंडा वगैरे काही नाही हं. पण सगळ्यांना हे वडे आवडतात नं, म्हणून करते. इतर वेळी का असे वडे केले जातात?

मोहन- शिवाय मीरा, तू परवा बाजारातून रताळी आणली आहेसच की.

राम- म्हणजे रताळ्याचा कीसही होणार. हं, मला तो फारसा म्हणजे वड्याइतका आवडत नाही, पण चालेल.

मीरा- राम भावजी, आवड निवड प्रत्येकाची वेगळी असते. पण रताळीही पौष्टिक असतात. उपास म्हटला की आपण बटाट्यावर जोर देतो, पण रताळी खावीत. मी तर असं वाचलं, रताळी आपण फक्त उपासालाच खातो. तसं न करता नेहमीच्या आहारात रताळ्यांचा समावेश करावा.

राम-असू दे, असू दे. फक्त मीरा वहिनी, मज गरीबावर दया करा आणि हे तुमचं मत किंवा माहिती आमच्या हिच्या कानावर घालू नका.

मोहन- हो, वहिनी तुमच्याहीकडे रताळी आणायच्या. --- आणि तुला त्याचे पदार्थ खायला लागायचे. असंच नं?

राम- हो नं. आमच्या हिचे इतके उपास होते चातुर्मासात, तेव्हा तुम्ही हे तिला ऐकवलं नाहीत ते बरं झालं.

मीरा- आता वैकुंठचतुर्दशीपर्यंत तुळशीचं लग्न आणि पाठोपाठ विवाहाचे मुहूर्त.

मोहन- चातुर्मास संपल्यावर आता तुमचा आवळीभोजनाचा कार्यक्रम आहे की नाही?

मंथन-६

मीरा- आहे तर. त्यावेळी आमची एक मैत्रीण मराठी रंगभूमीदिनानिमित्त एक एकपात्री प्रयोग सादर करणारही आहे.

राम- आपण आपल्या गल्लीतही पूर्वी अशी छोटी नाटुकली सादर करायचो, ते आठवतंय की नाही तुला?

मोहन- आठवतंय तर. येत्या पाच तारखेला यंदाचा मराठी रंगभूमी दिन. पण त्या दिवशी एक दिग्गज लेखक गंगाराम गवाणकर आपल्यात नाहीत ही जाणीव मराठी रसिकांना नक्कीच दुःखी करेल.

मीरा- त्यांचं वस्त्रहरण हे मालवणी बोलीतलं नाटक पार सातासमुद्रापार गेलं.

राम- दोघी, वरपरीक्षा, वात्रट मेले अशी इतरही काही नाटकं त्यांनी लिहिली, पण त्यांच्या वस्त्रहरण नाटकानं त्यांना आणि मालवणी बोलीला जी प्रतिष्ठा दिली ती काही औरच.

मोहन- त्यांच्या लेखनात विनोद, व्यंग आणि वास्तव यांचा सुरेख संगम होता.

राम- चला महाराजा, गप्पा गोड आहेत, पण आता मला निघायला हवं.

मीरा- वा रे वा. दिवाळी संपली असली तरी फराळ अजून आहे म्हटलं भावजी.

मोहन- मीरा, छानपैकी चिवडा वगैरे घालून भेळ करतेस का?

राम- मोहन, तोंडाला पाणी येईल असं काही बोलू नकोस बाबा. वहिनी, फक्त तुम्ही करून ठेवलेला चहा तेवढा द्या. मला पळू दे. खाल्लं तर पळता येणार नाही. मोहन- हो की. उद्याच्या मॅराथॉनमध्ये तू भाग घेणार आहेस वाटतं.

राम- हो तर. पळा पळा दिवाळी संपली, वजन कमी करायची वेळ झाली.-------

------------------------------------------------------------------

#ताजे लेखन #श्रुतिका