मंथन श्रुतिका २२ नोव्हे २५
राम- काय चाललंय मोहनराव?
मोहन- काय चालणार? अरे संसार संसार—
राम- अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर-
मोहन- आधी हाताला चटके, मग मिळते भाकर—
मीरा- आज काय, अगदी बहिणाबाईंच्या ओळी आठवताहेत?
मोहन- मग काय? दिवाळी होऊन इतके दिवस झाले, अजून आकाशकंदील काढला नाही, म्हणून बाईसाहेबांनी नोटीस दिली, आणखी काय?
राम- मगच जेवायला मिळेल अशी ताकीद दिली की काय मीरा वहिनींनी?
मीरा- राम भावजी, ताकीद बिकीद काही नाही, मी एवढंच म्हटलं, आकाशकंदील काढायला हवा.
राम- आणि तू पराचा कावळा केलास! काय हे मोहन-? यंदा दिवाळी पावसाळ्यात आली म्हणून काही मंडळींनी आकाशकंदिलावर छत्री लावली होती, तसं तू आता थंडी पडली म्हणून त्याला स्वेटर चढवायचास की नाही?
मोहन- मग आधी आकाशकंदिलाचा स्वेटर कुठे मिळतो का ते पाहायला हवं. तो जिथे मिळेल, तिथून आणायला हवा, त्याऐवजी मी म्हटलं, आकाशकंदील काढून टाकणंच सोपं आहे की नाही?
मीरा- मी अगदी हेच म्हणत होते की नाही?
राम- (नाटकीपणे) जाऊ दे वहिनी, एकवेळ माफ करा आमच्या मित्राला. कसूरीबद्दल माफी असावी.
मीरा- बरं बरं , पुरे झाली तुमची नाटकं. आकाशकंदिलाला छत्री काय, स्वेटर काय, अगदी उंच उंच पतंग उडताहेत तुमचे.
'''मंथन-२'''
मोहन- कल्पनेचे पतंग बाजूला राहूदेत, जमीनीवर या , जमीनीवर. उत्तरेकडच्या शीतलहरींमुळे धुळ्यात पारा चक्क ६. 2 अंशांवर ही बातमी वाचलीस का तू?
राम- वाचली आणि ती वाचून चक्क हुडहुडीच भरली मला. १४-१५ अंशांवर पारा गेल्यावर इथे आपली थंडीनं बोबडी वळत्ये, तिथे काय होत असेल?
मीरा- हो नं, कल्पनाच करायची आपण. पण सांगू, तितकी नाही, तरी पुणे जिल्ह्यातही भरपूर थंडी असणार, तरी ज्ञानेश्वर माउली, ज्ञानराज माउली तुकाराम असा घोष करत वारकरी आळंदी वारीला गेलेच आहेत. चालत.
मोहन- वारी आणि माऊलींचा ७२९ वा संजीवन सोहळा . या वेळी नामदेव महाराजांचे वंशज नामदास महाराज यांचं कीर्तन झालं. मंदिराच्या महाद्वारात काल्याचं कीर्तन झालं, हैबतबाबा दिंडीही तिथे पोचली. ''पाहुनी समाधीचा सोहळा,''
''दाटला इंद्रायणीचा गळा ''म्हणत भाविकांनी ज्ञानदेवांना श्रद्धांजली वाहिली.
राम- मोहन, ज्ञानेश्वरांनी इतक्या कोवळ्या वयात गीतेवर मराठीतून भाष्य केलं. किती अद्भुत आहे हे. भारतीय ज्ञानपरंपरेतलं हे लखलखतं दालन आहे.
मीरा- याला थोडी जोड देते हं. ब्रिटिश विद्वान सर अरनॉल्ड टॉयनबी यांनी म्हटलं आहे, ‘गेल्या दहा हजार वर्षांच्या इतिहासाचा धांडोळा घेतला तर असं दिसतं, जगात कितीतरी संस्कृती उदयाला आल्या आणि अस्ताला गेल्या. पण टिकून राहिली अशी भारतीय संस्कृती ही एकमेव संस्कृती आहे, कारण तिनं ज्ञानाला महत्त्व दिलं .
मोहन- मीरा, मूळचे सोलापूरचे आणि आता कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठात कार्यरत असणारे डॉ. कृष्णा किरण पवार यांनी केलेलं संशोधन जगभरात स्वीकारलं गेलं आहे. त्यांनी वाहनसुरक्षेसाठी काही सेन्सर विकसित केले. ते मद्यपान केलेल्या किंवा धूम्रपान केलेल्यांना वाहन चालवूच देत नाहीत.
'''मंथन-३'''
मीरा- मी तर ऐकलं, आपल्या एसटी महामंडळानं नव्या बसगाड्यांमध्ये हे गॅजेट बसवणं आवश्यक करण्याचं ठरवलं आहे.
मोहन- बरं होईल. अपघातांना आळा बसेल आणि व्यसनालाही. शिवाय वनक्षेत्रात आगीचा शोध घेणारं तंत्रज्ञानही त्यांनी विकसित केलं आहे. ते बऱ्याच देशांनी स्वीकारलं आहे.
राम- आता मी वाचलेलं सांगतो. भारतीय लष्कराच्या गजराज कोअरनं हिमालयाच्या कुशीत अरुणाचल प्रदेशात कामेंग खोऱ्यात प्रतिकूल परिस्थितीत जवानांना रसद पोचवण्यासाठी सोळा हजार फुटांवर धावणारी मोनोरेल सुरू केली आहे.
मीरा- खरंच, म्हटलं तर छोट्या वाटू शकणाऱ्या पण फार उपयोगी गोष्टींतल्या बदलांनी आपलं आयुष्य सुरक्षित करण्याचा हा वाढता प्रयत्न किती स्तुत्य आहे!
मोहन- ही सुधारणा अगदी आपल्या सोलापूरपर्यंत येऊन पोचली आहे बरंका. प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वे स्थानक, रूळ यांच्याही सुरक्षिततेसाठी बसवलेल्या कॅमेऱ्यांमुळे अनेक दुर्घटना टळतील.
राम- येणाऱ्या आणि जाणाऱ्या रेल्वे रुळांवर कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळली तर लगेच संबंधितांना त्याची माहिती लगेच मिळेल. अपघात टाळण्यासाठी तर चाकांमध्ये असामान्य उष्णता निर्माण होत नाही ना हे तपासण्यासाठी थर्मामीटर गनही बसवलेली आहे.
मीरा- विज्ञानानं या अनेक सुविधा आपल्याला उपलब्ध केल्या आहेत .वैज्ञानिक जगतातील नवीन प्रवाह कळावेत, भारताचं जगातलं स्थान आपल्याला कळावं म्हणून मराठी विज्ञान परिषद आणि रोटरी क्लबच्या वतीनं जी व्याख्यानमाला होते, त्या व्याख्यानमालेत संशोधक काशीनाथ देवधर यांनी भारताच्या शस्त्रास्त्र निर्मितीतल्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले, आपण पूर्वी इतर देशांकडून शस्त्रं घेत होतो, आता
'''मंथन-४''' या वर्षात आपण १ लाख ३७ हजार कोटींची शस्त्रास्त्र निर्मिती केली आहे. २३ हजार कोटींची शस्त्रं निर्यातही केली आहेत.
मोहन- ऑपरेशन सिंदूरचा दाखला त्यांनी दिला आणि सांगितलं, त्या वेळी भारताला मिळालेलं यश हे वैज्ञानिक दृष्ट्या केलेल्या लढाईचं यश आहे.
मीरा- आपण सर्वांनी नवीन नवीन माहितीचा खजिना उघड केल्याबद्दल हा चहा.
मोहन- खरं म्हणजे थंडीच्या दिवसात स्वेटरचं महत्त्व आहे, तितकंच-
राम- नाही मोहन, त्यापेक्षाही चहाचं महत्त्व जास्त आहे. कारण तो शरीराला उष्णता देतो, त्याचबरोबर मनही प्रफुल्लित करतो.
मीरा- त्याचबरोबर ही खारी बिस्किटंही घ्या –''' '''
मोहन- सोनेपे सुहागा म्हणतात ते यालाच.
मीरा- दुधात साखर असं आपल्या मातृभाषेत म्हणतात.
राम- पण मीरा वहिनी, दुधात मिठाचा खडा टाकणाऱ्या काही घटनाही घडताहेत.
मोहन- कुठल्या घटनेबद्दल बोलतोयस तू?
राम- मनुष्य आणि प्राणी जगत हे किती वर्षं एकत्र जगत आले आहेत! पण आता वन्य प्राण्यांच्या वनांवर आपण घाला घातला आणि कधी नव्हे तो महाराष्ट्रात वन्य प्राण्यांची दहशत जाणवते आहे.
मीरा- हो नं. किती ठिकाणी बिबट्यांनी माणसांवर हल्ले केले, किती पाळीव प्राण्यांचा घास घेतला-
राम- चंद्रपूरमध्ये तर एका अस्वलानं पाच तास एकाच्या घरातच मुक्काम ठोकला.
मोहन- एका जंगली हत्तीनं शेतात नासधूस केली अशीही बातमी होती.
'''मंथन-५''' मीरा- आपण प्रगतीच्या नावाखाली झाडांचं शिरकाण केलं, जंगलातले छोटे प्राणी कमी झाले, त्यामुळे शिकार करून पोट भरण्यासाठी या वन्य प्राण्यांना मनुष्य वस्ती जवळ करावी असं वाटू लागलं.
मोहन- म्हणून तर शेवटी आता त्यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करावी लागणार आहे.
राम- बिबट्यांची नसबंदी करून त्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्याचा निर्णय घेतला जातोय. जुन्नर विभागात प्रथमच ११५ बिबट्यांचं प्रायोगिक तत्वावर निर्बीजीकरण केलं जाणार आहे.
मीरा- आपल्या झाडांची आणि वनांची हेळसांड थांबवण्याचा त्यांच्या परीनं प्रयत्न करणाऱ्या काही लोकांपैकी एक म्हणजे पद्मश्री सालुमरदा थिमक्का. पण काही लोकांपैकी एक असं मी त्यांच्याबद्दल म्हटलं म्हणून त्यांच्या कामाचं मोल कमी होत नाही. ही बाई आई झाली नाही, म्हणून लोकांनी त्यांना हिणवलं, तेव्हा त्यांनी वृक्षवेलींना रुजवण्यात आणि वाढवण्यात स्वतःला झोकून दिलं.
मोहन- खूप झाडं लावली म्हणे त्यांनी-
मीरा- थोडी थोडकी नाहीत, तर बंगळूर दक्षिण जिल्ह्यातील हुलिकल ते कुडूर या साडेचार किलोमीटरच्या पट्ट्यात त्यांनी ३८५ वटवृक्ष लावले. जोपासले. त्यावरून त्यांना सालुमरदा ही उपाधी मिळाली. सालुमरदा म्हणजे झाडांची रांग. पण फक्त एवढीच झाडं त्यांनी लावली असं नाही हं. त्यांनी आठ हजारांहून जास्त झाडं लावली. त्यांचे पती चिक्कय्या यांनीही त्यांना या कामात मदत केली.
राम- माहिती आहे मला, त्यामुळेच त्यांना बीबीसीनं २०१६ मध्ये जगभरातील प्रभावी व्यक्तींमध्ये स्थान दिलं. आयुष्यभर कष्टकऱ्याचं जीवन वाटेला येऊनही थिमक्का त्यांच्या '''मंथन-६'''
वृक्षसंगोपनात गर्क राहिल्या. पिंपळ, औदुंबर या सारख्या त्यांनी लावलेल्या देशी झाडांच्या सावल्यांत त्यांना अपत्यप्रेमाचा साक्षात्कार झाला. त्यांना वाटे, ही मोठी झालेली झाडं ही आपल्याला सांभाळणारी मुलंच आहेत.
मीरा- अगदी सामान्यातली तिच्या असामान्य कामामुळे असामान्य ठरलेली ही स्त्री. ११४ वर्षांचं आपलं आयुष्य सत्कारणी लावून नुकतीच हे जग सोडून गेली.
मोहन- पण मी तर ऐकलं,कॅलिफोर्नियातील ऑकलंड येथे त्यांच्या नावानं थिमक्का रिसोर्सेस फॉर एनव्हायरोनमेंटल एजुकेशन ही संस्था त्यांच्या सफल संपूर्ण जीवनाची आठवण जगात तेवत ठेवते आहे.
राम- म्हणजे थिमक्का कीर्तिरूपानं आपल्यात आहेतच म्हणा नं.
मीरा- हो. त्यांच्या कामातून, त्यांनी लावलेल्या झाडांतून त्या आपल्याला प्रेरणा देत राहातील. सामान्य माणसंही काय करू शकतात, हे आपण समजून घेणं फार आवश्यक आहे.
मोहन- आमच्या भाळवणीच्या दादांकडूनही खूप काही शिकण्यासारखं आहे. तो गं, लक्ष्मणदादा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आणि पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यानं आणि भाळवणीच्या गावकऱ्यांनी स्वच्छता अभियान सुरू केलं आहे. त्यांनी ग्रामपंचायत कार्यालयापासून सुरुवात करून मंदिरापर्यंत स्वच्छता केली.
मीरा- हो बाई, ऐकलं आहे मी . एक शुक्रवार गावासाठी अशी घोषणा करून त्यांनी सुरुवात केली आणि हा उपक्रम चालू ठेवण्याची निर्धारही केला आहे.
राम- आपल्या संस्कृतीत श्रमदानाला फार महत्त्व आहे. त्यामुळे काम होतं आणि लोकसहभागामुळे एकी होते. जबाबदारीची जाणीवही होते'''. '''
'''मंथन-७'''
मीरा- गाव करील ते राव काय करील असं म्हणून तर म्हणतात.
राम- चला मोहनराव, गप्पा गोड आहेत पण कामं वाट पाहात आहेत. आमच्याही घरी आकाशकंदिलाबद्दल नोटीस निघण्याआधी तो काढून टाकायला हवा. तुझ्याकडून प्रेरणा घेतो आणि निघतो. तो काढलेला आकाशकंदील वर नीट ठेव बरं का मोहन—
मोहन- ठेवतो बाबा, ठेवतो.